Breaking

Monday, 1 June 2026

वादातून तलवारीने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सोनंद येथे भरदिवसा थरार; जमीन व्यवहाराच्या कारणावरून मारहाण, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

सांगोला / प्रतिनिधी :



तालुक्यातील सोनंद गावात जमीन खरेदीच्या वादातून एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश सुखदेव कोळसे (वय ४५, व्यवसाय हमाली, मूळ रा. सोनंद, ता. सांगोला, सध्या रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) हे कुपवाड येथे वास्तव्यास असून हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुले व भाऊ आण्णासाहेब कोळसे हे सोनंद येथे राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते अधूनमधून गावी येत असतात.

दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी कुपवाड येथून ते आपल्या मोटारसायकलवरून सोनंद येथे येत होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनंद-काशीदवाडी मार्गावरील कोरडा नदी पुलाजवळ ते पोहोचले असता तेथे उभ्या असलेल्या आण्णासाहेब गुंडिराम यादव यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विचारणा केली असता, "देवा लक्ष्मण निकम यांची जमीन खरेदी करू नये," या कारणावरून वाद घालत धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आण्णासाहेब यादव यांनी दूरध्वनीद्वारे सिद्धेश्वर भारत यादव, साहेबराव भारत यादव, गुंडिराम बाळासाहेब यादव व श्रीराम आण्णा यादव यांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळातच हे सर्व जण तेथे आले आणि त्यांनी एकत्रितपणे फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, सिद्धेश्वर यादव याने हातातील तलवारीने प्रकाश कोळसे यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आण्णासाहेब यादव याने फायबरच्या काठीने त्यांच्या अंगावर मारहाण केली. साहेबराव यादव याने जीवे मारण्याची धमकी दिली, तर गुंडिराम यादव व श्रीराम यादव यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या रणजित विलास काशीद व अभिजित आण्णासाहेब कोळसे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. जखमी अवस्थेत प्रकाश कोळसे हे आपल्या नातेवाईकांसह घरी गेले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्या जखमेतून रक्तस्त्राव सुरू झाल्याने पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र फिर्यादी यांनी सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सिद्धेश्वर भारत यादव, साहेबराव भारत यादव, आण्णासाहेब गुंडिराम यादव, गुंडिराम बाळासाहेब यादव व श्रीराम आण्णा यादव (सर्व रा. सोनंद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जमीन व्यवहारातून वाद वाढल्याची चर्चा

सोनंद परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याची चर्चा असून, त्याचे पर्यवसान थेट तलवारीच्या हल्ल्यात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावात या घटनेची दिवसभर चर्चा सुरू होती. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला आहे.