वीज कोसळून म्हैस दगावली; दोन ठिकाणी घरांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
सांगोला | प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात ७ जूनच्या रात्री झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे विविध गावांमध्ये नुकसानाच्या घटना घडल्या. नवी लोटेवाडी येथे वीज कोसळून एक म्हैस मृत्यूमुखी पडली, तर पाचेगाव बुद्रुक आणि किडेबिसरी येथे राहत्या घरांचे नुकसान झाले. सुदैवाने सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नवी लोटेवाडी येथील लवटे वस्तीवर ७ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बिभीषण आप्पा लवटे यांच्या गट क्रमांक ४४५ मधील राहत्या घरासमोर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्यांच्या मालकीची एक म्हैस जागीच दगावली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लवटे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच रात्री पाचेगाव बुद्रुक येथे सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास स्वाती नामदेव मंडले यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. भिंत पडल्यामुळे घराचे नुकसान झाले असून घरातील सदस्य सुरक्षित असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे कुटुंबासमोर घराच्या दुरुस्तीचे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, किडेबिसरी येथे रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास जालिंदर सिताराम कोळेकर यांच्या राहत्या घराचे छत कोसळले. छत कोसळल्याने घराचे आणि घरातील साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
घटनांची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने संबंधित ठिकाणी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नुकसानग्रस्तांना शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पाऊस आणि विजांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच घरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
