Breaking

Saturday, 15 November 2025

हजारो मैलांचा प्रवास करून पायमोज वटवट्या सांगोल्यात दाखल

 

सांगोला/प्रतिनिधी ः



अचकदाणी, ता.सांगोला युरोप, रशिया, सायबेरिया अशा अनेक देशांमध्ये बर्फाळ हिवाळ्यामुळे अन्नाची कमतरता, प्रजनन, अधिवास प्रतिकूलता अशा अनेक कारणांमुळे विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून भारतीय उपखंडात दाखल होतात. यामध्ये आकाराने मोठे असणारे परदेशी राजहंस, चक्रवाक बदके, तलवार बदक, पाणथळीतील व गवताळ प्रदेशातील विविध पक्षी, त्याचप्रमाणे लहान आकाराचे अनेक माशीमार, थिरथिर्‍या पक्षी स्थलांतर करून महाराष्ट्रात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला तालुक्यातील अचकदानी हे गाव हिवाळी परदेशी पाहुण्या पक्ष्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. अचकदाणी गाव, वन विभाग परीक्षेत्र रोपवाटिका व परिसरातील जलाशय हा अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी माहेरघर बनला आहे. भारताचे ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर दिनांक 5ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला गेला. सांगोल्यातील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे हे पक्षी सप्ताहामध्ये अचकदानी वनविभाग परिक्षेत्र येथील रोपवाटिकेमध्ये पक्षी निरीक्षणास गेले असता त्यांना पायमोज वटवट्या या लहान आकाराच्या स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले. त्यांनी त्यांच्याकडील कॅमेर्‍याने या पक्ष्याचीछायाचित्रे टिपली. हे पक्षी उत्तर युरोप व मध्य आशिया मधील त्यांच्या प्रजनन स्थळांपासून भारतीय उपखंडामध्ये हिवाळ्या दरम्यान स्थलांतर करतात.

पायमोज वटवट्याला बुूटेड वॉर्बलर असेही संबोधले जाते. हा एक लहान आकाराचा पक्षी आहे. याचा रंग साधारणपणे वरून फिकट तपकिरी आणि पोटाकडील बाजूस पांढरट असतो. याच्या शेपटीच्या बाहेरील बाजूस फिकट कडा असतात आणि डोळ्यांवर एक छोटी फिकट भुवई रेषा असते. वटवट्या या पक्षी कुळात येणार्‍या या पक्ष्याची चोच मजबूत आणि टोकदार असते. हा पक्षी झुडपे आणि इतर उंच वनस्पती असलेल्या मोकळ्या भागात घरटे बांधतो. इतर वॉर्बलर्सप्रमाणे, हा पक्षी कीटकभक्षी आहे. वॉर्बलर कुळातील बुटेड वॉर्बलर व सायकस वॉर्बलर या अत्यंत साधर्म्य असणार्‍या दोन प्रजाती स्थलांतर करून हिवाळ्यात महाराष्ट्रात येतात.

अचकदानी येथे गेली अनेक वर्षे सातत्याने परदेशी पाहुणे पक्षी आढळत असल्यामुळे वन्यजीव प्रेमी व छायाचित्रकार येथे भेट देण्यास पसंती दाखवीत आहेत.

चक्रीवादळामुळे हवामानामध्ये होणार्‍या बदलांचा परिणाम पक्षांच्या स्थलांतरावर होताना दिसून येत आहे. अनेक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी थोडे उशिराने भारतीय उपखंडात दाखल होत आहेत. सांगोला तालुक्यातील ब्रह्म ओढा, बुद्धेहाळ तलाव, वाढेगाव बंधारा व अचकदानी वनपरिक्षेत्र येथे दरवर्षी अनेक प्रजातींचे हिवाळी परदेशी पाहुणे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून दाखल होतात. या पक्ष्यांचे दुर्बिणी मधून निरीक्षण करणे व छायाचित्रीकरण करणे हे वन्यजीव अभ्यासकांसाठी पर्वणी ठरत आहे. 

प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे

पक्षी अभ्यासक, सांगोला